“अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:56 PM2023-09-07T12:56:01+5:302023-09-07T12:58:44+5:30
Snajay Raut: मनोज जरांगे हा फकीर माणूस आहे. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले. ते झुकणार नाहीत, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
Snajay Raut: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लाचा निषेध संपूर्ण राज्यभरात नोंदवला गेला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
सरकारने ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे गुंडाळले जाणारे व्यक्तिमत्त्व नाही, असे म्हटले आहे.
अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही
मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आपला प्राण पणाला लावला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कधीकाळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केले होते. तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी करायला गेले होते. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आजही भ्रष्टाचार आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले. पण मनोज जरांगे गुंडाळले जाणारे व्यक्तिमत्व नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले आहे. ते झुकणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अफगाणिस्तान, पाकिस्तान इराण हे देश भारतात आणणार असाल तर आम्ही त्याचे स्वागत करू. अखंड भारत म्हणजे जमिनीचा एक तुकडा नाही. अखंड भारत म्हणजे या देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे हित आणि एकतेचा विचार हे आहे. जमिनीने देश बनत नाही. तर लोकांनी देश बनतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत जर अखंड भारतावर बोलत असतील तर त्यांनी ते जरूर करावे. केवळ बोलून न दाखवता इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांनीही आपल्यासोबत आणा, असे संजय राऊत म्हणाले.