Sanjay Raut Javed Akhtar: "भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:52 PM2023-02-23T12:52:32+5:302023-02-23T12:53:06+5:30
संजय राऊतांनी केलं जावेद अख्तर यांचं कौतुक, PM मोदींना मारली कोपरखळी
Sanjay Raut Javed Akhtar: प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. फैज फेस्टिव्हल २०२३ मध्ये जावेद अख्तर यांनी मुंबईवरील हल्ल्यावरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. या विधानानंतर जावेद अख्तर यांचे देशभरातून कौतुक होत आहे. यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जावेद अख्तर यांचे कौतुक केले. 'भारतात बसून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनवणाऱ्या व्यक्तीची छाती ५६ इंचापेक्षाही मोठी आहे,' असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खोचक टोला लगावला.
"जावेद अख्तर यांचं अभिनंदन मी एकट्यानेच नव्हे तर संपूर्ण देशाने करायला हवे. त्यांचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या साऱ्यांनीच त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर भाजपाच्या लोकांनी ठिकठिकाणी फटाके वाजवले होते जणू काही पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट झाला. आम्हालाही त्या वेळी आनंद झाला होता. पण ज्या पद्धतीने आता जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांची धुलाई केली, त्यासाठी हिंमत लागते. त्यामुळे भाजपाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी अभिनंदन केले पाहिजे," असे रोखठोक मत संजय राऊत यांनी मांडले.
"भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची छाती ५६ इंचापेक्षाही मोठी"
जावेद अख्तर यांनी जेव्हा परखड भूमिका मांडली होती, तेव्हा हेच लोक त्यांच्यावर टीका करत होते. त्यांना पाकिस्तानात चालते व्हा असं सांगत होते. पण आज त्याच जावेद अख्तर यांनी पाकिस्तानत जाऊन त्यांच्यावर टीका केली. 'आमच्या मुंबईवर, देशावर हल्ले करणारे तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत,' असे त्यांनी सुनावले. भारतात बसून पाकिस्तानला सुका दम देणे ठीक आहे, पण तिथे जाऊन त्यांना सुनावणाऱ्या व्यक्तीकडे ५६ इंचापेक्षाही मोठी छाती आहे असं मी मानतो", अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आणि भाजपाच्या नेतेमंडळींचाही समाचार घेतला.