'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:34 AM2023-01-27T10:34:20+5:302023-01-27T10:34:26+5:30
'शरद पवारांबाबत अशाप्रकारे बोलणं म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर मोठा आरोप करण्यासारखं आहे.'
मुंबई: काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात नवीन युतीची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. पण, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा निभाव लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'प्रकाश आंबेडकरचांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचितची युती झाली. आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि वंचित यात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत अशाप्रकारची विधाने करणे आम्हाल मान्य नाही.'
ते पुढे म्हणाले, 'शरद पवार महाराष्ट्र आणि देशातील मोठे नेते आहेत. ते भाजपचे आहेत, असं बोलणं त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर मोठा आरोप करण्यासारखा आहे. जर ते भाजपचे असते, तर महाराष्ट्रात त्यांनी भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली नसती. त्यांनी प्रत्येक वेळेस भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही देशात विरोधी एकीचा उल्लेख करतो, तेव्हा शरद पवारांचे नाव पुढे येते.'
'त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जपून बोलायला हवं. उद्धव ठाकरे आणि त्यांची चर्चा झालीये की, भविष्यात महाविकास आघाडीत सोबतच काम करावं लागणर आहे. त्यामुळे भूतकाळातील मतभेद दूर ठेवून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न करावा,' असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच, महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही, असं नाना पोटले म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'आम्ही राहुल गांधीशी बोलू, माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे.'