"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:12 PM2024-09-26T15:12:44+5:302024-09-26T15:13:52+5:30

सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

Sanjay Raut punishment in Medha Somaiya defamation case , question mark on country judiciary by Raut | "सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

मुंबई - किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरील आरोपानंतर संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत या निकालाला वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितले आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार..हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण मी बोललो काय... युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडलंय, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे. मी काही प्रश्न उपस्थित केले, मुलुंडचा पोपटलालही असे आरोप करतो. ते किती आरोप करतात. मी कोर्टासमोर पुरावे सादर केले. संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. आमच्याकडे पुरावे असून आम्ही सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच हा खटला समजून घेतला पाहिजे. हा विषय युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्याला शौचालय बनवण्याची कामे मिळाली. त्यात घोटाळा भ्रष्टाचार झालाय असा आरोप मी केला नाही. पहिला आरोप विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी केला. त्यांनी तसं पत्र दिले. त्याच्यावर कामात गडबड असल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपासोबत आहेत त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. यावर चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी विधानसभेचा आदेश पारित झाला. फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणला मग मी अब्रुनुकसानी कुठून केली, पहिली अब्रुनुकसानी प्रविण पाटील यांनी केली, दुसरी मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे त्यांनी केली, प्रताप सरनाईक यांनीही अब्रुनुकसानी केली. विधानसभेत चर्चा झाली त्यांनीही अब्रुनुकसानी केली. पण सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. हा पुरावा जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतोय, जनतेच्या पैशांचा अपहार होतोय त्याबाबत आम्ही काही बोलायचे नाही. याचं कारण न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडवाचे मोदक खायला त्यांच्या घरी पंतप्रधानांना बोलवतात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी करत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

Web Title: Sanjay Raut punishment in Medha Somaiya defamation case , question mark on country judiciary by Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.