Sanjay Raut: "तुम्ही भाजपच्या सत्तेतील गुलाम आहात हे जाहीर करा नाहीतर..."; संजय राऊतांचा राग अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:31 PM2023-04-11T12:31:01+5:302023-04-11T12:32:52+5:30
Eknath Shinde Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, आता एकनाथ शिंदे काय करणार ते आम्हाला पाहायचंय!
Sanjay Raut Eknath Shinde Chandrakant Patil: "शिवसेना आणि हिंदुत्वाचे नाव घ्यायचा अधिकार शिंदे गटाला नाही, तुम्ही जाहीर करा की आम्ही भाजपच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंधे आहोत नाहीतर राजीनामे द्या. चंद्रकांत पाटील बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे जे बोलले आहेत, त्यावर आम्ही काय बोलायचं ते आम्ही बघू. पण चंद्रकांत पाटील हे शिंदे सरकारमधील मंत्री आहेत. ते म्हणाले की बाबरी पाडण्यात शिवसेनेचा आणि शिवसेना प्रमुखांचा काडीमात्र संबंध नव्हता. ते ही गोष्ट कुचेष्टेने बोलले होते. यावर शिंदे गट त्यांच्याबद्दल बोलण्याची हिंमत दाखवणार आहेत की पुन्हा एकदा शरण जाणार आहेत, हे आम्हाला पाहायचे आहे," अशा शब्दांत शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी असा दावा केला, "६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते. रा. स्व. संघाची ताकद आमच्या पाठीशी होती, पण ते उघडपणे सहभागी झाले नाहीत. त्यांनी त्यांची काम समविचारी संघटनांना वाटून दिली होती. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?" असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या मुद्द्यावर आज राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि शिंदे गटालाही टोला लगावला.
"एवढे दिवस पळपुटे चंद्रकांत पाटील कुठे होते? चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती, तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी," असेही राऊत म्हणाले.