“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:02 PM2023-05-24T17:02:04+5:302023-05-24T17:02:47+5:30
Maharashtra Politics: भाजपसोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गौप्यस्फोटांच्या मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. २ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती पण सरकार पडले असते. याचा अर्थ तुम्ही समजून जा, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. तसेच एक मोठा दावाही केला. जयंत पाटील यांच्यावर भाजपकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा संजय राऊत यांनी केला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुख सांगत आहेत ते खरे आहे
अनिल देशमुख सांगत आहेत ते खरे आहे. मला ते संपूर्ण प्रकरण माहिती आहे. अनिल देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्यांना भाजपने काय ऑफर दिली होती त्याचे पुरावे अनिल देशमुखांकडे आहेत. इतकेच नाही, तर त्याबाबतचे काही व्हिडिओही त्यांच्याकडे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.