'पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळेलच'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:53 PM2019-12-02T12:53:26+5:302019-12-02T13:23:40+5:30

पंकजा मुंडे भाजपा सोडणार का?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

sanjay raut reacts after asked about bjp leader pankaja munde joining shiv sena | 'पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळेलच'

'पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळेलच'

googlenewsNext

मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.

राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक वेगळा गट तयार करण्यावर एकमत झालं आहे असल्याची माहिती आहे. 



काल पंकजा मुंडेनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावरुनही भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं होतं. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं, हे ठरवण्यासाठी येत्या १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी पोस्टच्या माध्यमातून केलं. त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणता मोठा निर्णय करणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

​​​​​​​


सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं व्यक्त केलेल्या भूमिकेमुळेदेखील पंकजा मुंडे नेमकं काय करणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'भाजपानं बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणं यापुढे अवघड जाईल असं वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानानं पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. 170 चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा 185 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचं ‘कर्मफळ’ आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला इशारा दिला आहे.

Web Title: sanjay raut reacts after asked about bjp leader pankaja munde joining shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.