“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:12 PM2024-07-04T19:12:40+5:302024-07-04T19:13:23+5:30

Sanjay Raut News: लोक हतबल आहेत. गरीबी आणि महागाईमुळे ते पिचलेले आहेत. त्यामुळे ते अशा बाबांकडे जातात, अशी टीका संजय राऊतांनी केली.

sanjay raut replied bjp and pm modi over hathras incident | “देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरस येथे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. हे तिथूनच सुरू होत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी एका पंतप्रधानाप्रमाणे वागायला हवे. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बुवा म्हणवून घ्याल. तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घ्याल. तुम्ही हिंदू आणि मुस्लीम कराल. इतरांना काय सांगणार, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदार घेऊन आसामला जातात. कामाख्या देवी मंदिरात रेडे कापतात. त्यांच्यावर कोण कारवाई करणार? कायद्याने यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली. 

खारघर आणि हाथरसमधील बळी हे अंधश्रद्धेचे बळी

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. खारघरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत २५ लोकांचा चेंगराचेंगरीत बळी गेला होता. खारघर आणि हाथरसमधील बळी हे अंधश्रद्धेचे बळी असून, सरकार खतपाणी घालत आहे. या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते प्रतिष्ठा देत असतात. त्यामुळेच अशाप्रकारच्या दुर्घटना घडत असतात.  हाथरसमध्ये सत्संग भरविणाऱ्या भोले बाबावर योगी सरकारने गुन्हा दाखल केलेला नाही. ८० हजार जणांची सत्संगाला परवानगी असताना त्याठिकाणी अडीच लाख लोक जमले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोक हतबल आहेत. गरीबी आणि महागाईमुळे ते पिचलेले आहेत. त्यामुळे ते अशा बाबांकडे जातात. भाजपाच्या काळात अंधभक्त निर्माण झाले आहेत. पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानतात. त्यांचा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही, असे तेच सांगतात. जर पंतप्रधानच असे वागत असतील तर देशात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली.
 

Web Title: sanjay raut replied bjp and pm modi over hathras incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.