"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:58 AM2024-10-07T10:58:35+5:302024-10-07T11:09:03+5:30

वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम श्रीकांत शिंदे करतात असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut response to CM Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray | "चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut On Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. अनेक दिग्गज नेते पक्षांना सोडून विरोधी किंवा सत्ताधारी पक्षात जाताना दिसत आहेत. अशातच कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. शिंदेच्या गटाचे युवासेना प्रदेश सचिव व केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच मुख्यमंत्र्यांचे कारटे असा उल्लेख केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं होतं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. शिंदेच्या गटाचे युवासेना नेते दीपेश म्हात्रेंनी मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे आणि जवळपास पाच माजी नगरसेवकांनी मशाल हाती घेतली. दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कारटं असा उल्लेख केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं होतं. मुख्यंमत्री शिंदेंनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू. चिंता करु नका आताही भिडतो आहोत. तुमच्याकडे मोदी आणि शाहांची कवच कुंडले आहेत. ही कवच कुंडले आहेत म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरु आहे. ज्या दिवशी कवच कुंडले काढली जाईल तेव्हा तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चिरंजीवाविषयी वक्तव्य केलं आहे. पण त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे आपल्या वडिलांनी एकदा समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करत आहेत. राज्याच्या इतिहासात वर्षा बंगल्यातून अशा प्रकारची अरेरावी कधी झाली नव्हती. मुख्यमंत्री हे ४० टक्के असतील तर त्यांचे चिरंजीव हे २० टक्के आहेत. वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते हे सगळ्यांना माहिती आहे. पोलिसांना, अधिकाऱ्यांना धमकावण्याचे काम वर्षा बंगल्यातून त्यांचे चिरंजीव करत आहेत", असेही संजय राऊतांनी म्हटलं.
 

Web Title: Sanjay Raut response to CM Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.