“लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:04 PM2024-06-27T18:04:55+5:302024-06-27T18:05:31+5:30

Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा, असे अप्रत्यक्ष संकेत संजय राऊतांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

sanjay raut said maha vikas aghadi should declare cm post candidate for next maharashtra assembly election | “लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

“लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut News: राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही चर्चेच्या विषय ठरल्या. या घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचे सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा, असे अप्रत्यक्ष संकेत संजय राऊतांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया

या संदर्भातील निर्णय एकत्र बसून घेऊ. मविआच्या बैठकीत जो काही फॉर्म्युला ठरेल तो अंतिम असणार आहे. संजय राऊत यांचे वैयक्तिक मत असेल. महाविकास आघाडी चर्चा करुन काय ते ठरवेल, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर, ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली असून त्यात संजय राऊतांनी काडी टाकाण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यासारखे काहीजण मिसगाईड करतात. संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा पाहिजे? हे त्यांनी ठरवले पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटते की, काँग्रेस हे मान्य करणार नाही. ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर निवडणुका लढतील याची शक्यता नाही. एकवेळेला महाविकास आघाडी तुटेल पण अशा पद्धतीचा चेहरा समोर येणार नाही. हे सत्य आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
 

Web Title: sanjay raut said maha vikas aghadi should declare cm post candidate for next maharashtra assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.