“राज आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा...”; संजय राऊतांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:41 AM2023-07-07T11:41:48+5:302023-07-07T11:48:24+5:30
Sanjay Raut: शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजित पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याचा दावा केला जात असून, याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला राज ठाकरेंशी बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा एकमेकांशी बोलू शकतात. राज ठाकरेंसोबतची माझी मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत
शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे खोटे असेल तर पुन्हा शिवसेनेचे नाव घेणार नाही. तिकडचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोललेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या व्यथा ऐकतो, कारण ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी अनेक वर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे. आमचे जुने संबंध आहेत. मधल्या काळात आमचा एकमेकांशी संपर्क नव्हता. परंतु गेल्या आठ दिवसापासून ते आमच्याशी संपर्क करत आहेत. आम्ही असं म्हणत नाही की, ते आमच्याकडे आले आहेत किंवा आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतले आहे. कारण, तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.