Sanjay Raut: कोर्टात संजय राऊतांनी केली ईडीची तक्रार, न्यायाधीशांनी खडसावल्यावर ईडीची माफी, नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:53 PM2022-08-04T13:53:42+5:302022-08-04T14:05:52+5:30
Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, त्यांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने ईडीने आज राऊत यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने विचारणा केल्यावर संजय राऊत यांनी ईडीविरोधात तक्रार केली.
मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेची कारवाई झालेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, त्यांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने ईडीने आज राऊत यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने विचारणा केल्यावर संजय राऊत यांनी ईडीविरोधात तक्रार केली. तसेच आपल्याला व्हेंटिलेशन नसलेल्या रुममध्ये ठेवल्याचे तसेच तिथे चांगली व्यवस्था नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोर्टाने फटकार लगावल्यावर ईडीने माफी मागत संजय राऊत यांच्यासाठी व्हेंटिलेशन असलेल्या रुमची व्यवस्था करण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र राऊतांचा दावा चुकीचा असल्याचेही ईडीने सांगितले.
संजय राऊत यांना आज कोर्टात हजर केले असता ईडीच्या कोठडीत काही त्रास आहे का? अशी विचारणा न्यायमूर्तींनी करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी कोठडीत झालेल्या त्रासाबाबत कोर्टाकडे ईडीविरोधात तक्रार केली. मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे कसलंही व्हेंटिलेशन नाही. तसेच तिथे चांगली व्यवस्था नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर कोर्टाने ईडीला फटकारले. तसेच ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच तुम्ही यावर काय पाऊलं उचणार अशी विचारणा कोर्टाने ईडीकडे केली. राऊतांना त्रास होणार नाही असं तुम्ही लेखी दिलं होतं, त्याचं काय झालं, असा प्रश्न कोर्टाने ईडीला विचारलं.
त्यानंतर उत्तर देताना ईडीने कोर्टाची माफी मागितली. तसेच संजय राऊतांना ज्या ठिकाणी ठेवलंय तिथे एसीची व्यवस्था केलेली आहे. आम्ही राऊतांना व्हेंटिलेशन असलेली रूम देण्यास तयार असल्याचे ईडीने सांगितले. तसेच संजय राऊत जी तक्रार करत आहेत ती चुकीची आहे, असं ईडीने सांगितलं.
दरम्यान, कोर्टात येत असताना संजय राऊत आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. माध्यमे आणि शिवसैनिकांना पाहून हातवारे करत असलेल्या संजय राऊत यांना रोखण्याचा प्रयत्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी केला. त्यामुळे संजय राऊत हे सुरक्षा रक्षकांवर भडकलेले दिसून आले.