राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला...; संजय राऊतांचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:49 AM2023-04-17T10:49:36+5:302023-04-17T10:52:26+5:30
"सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी योग्यच"
Sanjay Raut vs Eknath Shinde Devendra Fadnavis: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेमुळे विरोधी पक्ष सरकारवर चांगलाच संंतापला आहे. सरकारने श्रीसदस्यांचा अंत पाहिला, असा अतिशय गंभीर आरोप शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
" महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी ही दुर्दैवी घटना आहे. आप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या सोहळ्याला जमतील हे साऱ्यांनाच माहिती होते. त्यामुळे सरकारने जी तयारी करायला हवी होती, ती फक्त VIP लोकांसाठीच केली असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे लाखो सदस्य आले होते. त्या लाखोंची सोय न पाहता, केवळ गृहमंत्री अमित शाह यांची सोय पाहता भर दुपारच्या वेळेत ही सभा आणि सोहळा ठेवला गेला. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. गृहमंत्री आणि VIP छपराखाली होते, पण श्रीसदस्य उन्हात होते. आम्हाला सोहळ्यावर टीका करायची नाही. राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला", असे अतिशय रोखठोक मत संजय राऊतांनी व्यक्त केले.
"या कार्यक्रमात समोर ऊन्हात बसलेल्या लोकांचा विचार न करता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता त्यांचाच जास्त विचार करण्यात आला होता. आप्पासाहेब वगळता इतर सर्व राजकीय लोकांच्या कुरघोड्या सुरू होत्या. आप्पासाहेब यांना मानणारा समुदाय समोर बसला होता. त्यांना राजकारणाशी घेणंदेणं नव्हतं. पण राजकारण्यांनी त्या लोकांचा अंत पाहिला आणि त्यामुळे त्यांचा बळी गेला ही बाब दुर्दैवी आहे," असा आरोप राऊतांनी केला.
दरम्यान, उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी भेट घेतली. नागपूरमधील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपवून रात्री १.३० वाजताच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केली.