माझ्या कुटुंबावर ED चा दबाव तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरे परिवारासोबत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:38 PM2022-06-23T12:38:47+5:302022-06-23T12:39:31+5:30
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४०हून अधिक आमदारांची बंडखोरी
Sanjay Raut vs Eknath Shinde, Shivsena: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे विविध विधानांमुळे कायम चर्चेत असतात. सध्या शिवसेनेत उभी फूट पडली असून ४०हून जास्त आमदारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर गटाचे नेतृत्व शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे करत असून शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या दाव्याला उत्तर देत, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी रस्त्यावर उतरली तीच खरी शिवसेना असे संजय राऊत म्हणाले. त्यासोबतच, माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे पण तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरे परिवारासोबतच राहीन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
"जेव्हा विधानसभेत बहुमत चाचणी केली जाईल तेव्हा सत्य सर्वांसमोर येईल यात वादच नाही. फ्लोअरटेस्ट मध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह दिसेलच. एकनाथ शिंदे हे जुन्या भाषणात म्हणायचे की भाजपा आपल्यावर अत्याचार करत आहे. त्यामुळे त्यांची साथ सोडा अशी मागणी हे लोक करत होते. पण आता वेगळी मागणी करत आहे", असा आरोपही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला.
"पळाले ते शिवसैनिक नाहीत..."
ईडीच्या भीतीने किंवा अन्य काही आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील तर ते योग्य नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ म्हणून घेत होते, ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर पाहिला तो खरा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अद्यापही मजबूत आहे. काही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली. "गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही", असा आरोपही संजय राऊत यांनी केला.