संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:34 PM2023-08-18T12:34:09+5:302023-08-18T12:35:36+5:30

निवडणुकांमध्ये मतभेद दाखवायचे नाहीत असं आमचं ठरलंय!

Sanjay Raut says Mahavikas Aghadi is ready with election candidates formula slams bjp | संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

googlenewsNext

Sanjay Raut, Mahavikas Aghadi vs BJP: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये मोठी फूट पडली. या फुटीनंतर आता महाविकास आघाडी कमकुवत होईल असे म्हणले जात होते. तसेच मविआ ही आघाडी संपुष्टात येईल असाही अंदाज व्यक्त केला जात होता. पण मविआ आधीइतकीच भक्कम आहे असे विविध नेतेमंडळींकडून वारंवार सांगितले जात आहे. तसेच, राज्याच्या विधानसभा निवडणुका मविआ एकत्र लढवणार असल्याचीही चर्चा आहे. अशातच संजय राऊत यांनी 'मविआ'च्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मविआमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. 'जिंकेल त्याची जागा' आमच्या आघाडीचे सूत्र आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी मातोश्रीवरील बैठकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह इतर काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असताना काही विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र असे सूत्र ठरल्याने अनेक ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांमध्ये धुसफूस पाहायला मिळू शकते असे मानले जात आहे.

"महाराष्ट्रात महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढणार. तीन पक्ष असल्याने अनेकांना तडजोडी कराव्या लागतील. त्याला आमची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या प्रमुखांनी ठरवलंय की, जागा वाटपावरुन कुठेही मतभेद उघड करायचे नाहीत. आपल्याला एकत्र यायचंय आणि निवडणुका जिंकायच्यात. जागेचा हट्ट धरायचा नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलेलं आहे", असे ते म्हणाले.

सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. यात धक्का बसण्यासारखं काही नाही. हा भीतीपोटी घेतलेला निर्णय आहे. या राज्यातील सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे पॅनल शंभर टक्के जिंकणार होते. ती भीती सरकारला होती, त्यामुळेच निवडणुका रद्द करण्यात आल्या. पण हे सरकार अशा किती निवडणुका रद्द करणार?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीयेत कारण भाजपाला भीती आहे ठाकरे गट जिंकेल", असंही राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay Raut says Mahavikas Aghadi is ready with election candidates formula slams bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.