Sanjay Raut : 'हा तर महाराष्ट्राचा अपमान', मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:41 AM2022-02-08T11:41:49+5:302022-02-08T11:41:58+5:30
'महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टाने दिले होते.'
नवी दिल्ली: काल संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला. या आरोपावर आता महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'पंतप्रधानांचे वक्तव्य ऐकून वाईट वाटलं,'असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचा अपमान
आज संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केला, त्यावर महाराष्ट्र सरकारने बोलायला हवे. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. राज्यातील अनेक डॉक्टर, नर्सेस यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केले, हा त्यांचाही अपमान आहे', असे राऊत म्हणाले.
भाजप नेत्यांनी बोलावं
ते पुढे म्हणतात, 'कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला. जागतिक आरोग्य संघटनेने याचा खुलासा केला आहे. त्यांनी कोरोना काळात धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. पण, महामारीचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले स्वतः सुप्रीम कोर्टाने, हाय कोर्टाने दिले होते. आता यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवं', असंही संजय राऊत म्हणाले.