"आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटं मोडत बसा"; भाजपाचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:50 PM2022-06-12T17:50:31+5:302022-06-12T17:51:22+5:30
शिवसेनेचा राज्यसभा निवडणुकीत पराभव
Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Elections 2022: शिवेसेनचा राज्यसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या जागेवर पराभव झाला. त्यानंतर आता शिवसेनेचे काही नेते आक्रमकपणे भाजपावर आरोप करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यात अग्रणी आहेत. राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत अपक्ष आमदार विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असेही राऊत म्हणाले. या साऱ्या आरोपांनंतर भाजपाकडून राऊतांना जोरदार टोला लगावण्यात आला.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर हे शिवसेनेच्या नेत्यांना उत्तर देण्यात कायमच पुढे असतात. संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांत पराभवाची कारणं सांगताना भाजपा नेत्यांवर आरोप केले. त्याला भातखळकर यांनी जोरदार उत्तर दिले. "५६ आमदारांच्या जीवावर पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्या काहींना चाणक्य बनल्याचा गैरसमज झाला होता. तो यापूर्वी सरला नसेल तर राज्यसभेचे निकाल लागल्यानंतर तरी सरायला हवा. एकदा आणि शेवटची सत्ता मिळाली, आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटं मोडत बसावं लागणार आहे", असा टोला भातखळकरांनी संजय राऊतांना लगावला.
५६ आमदारांच्या जीवावर पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्या काहींना चाणक्य बनल्याचा गैरसमज झाला होता. तो यापूर्वी सरला नसेल तर राज्यसभेचे निकाल लागल्यानंतर तरी सरायला हवा. एकदा आणि शेवटची सत्ता मिळाली, आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटं मोडत बसावं लागणार आहे. https://t.co/5gJTapzx1f
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 12, 2022
दरम्यान, संजय राऊत हे पंकजा मुंडे यांच्याबद्दलही बोलले होते. ''आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच कौटुंबिक नात्याने आम्हाला चिंता वाटणार. राजकारण हे राजकारण्याच्या दिशेने आहे'', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्याबाबत काळजी व्यक्त केली.