संजय राऊतांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 09:51 AM2023-01-21T09:51:33+5:302023-01-21T09:55:52+5:30
Ramdas Athawale : संजय राऊत यांनी २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
उल्हासनगर : संजय राऊत (Sanjay Raut) आमच्या यात्रेत सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये काल काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. काल पहाटेच संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत केले. यावर प्रसार माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय राऊत यांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
'धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार'
याचबरोबर, शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. येत्या ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करावयाचे आहेत. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता पास कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता, एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आणि १३ खासदार आहेत. त्यामुळे 'धनुष्यबाण' हे चिन्ह त्यांनाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असे रामदास आठवले म्हणाले.