Deepali Sayed : "उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या", दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 03:46 PM2022-07-26T15:46:37+5:302022-07-26T16:01:32+5:30
Shivsena Deepali Sayed And Sanjay Raut : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद सय्यद यांनी मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Uddhav Thackeray) यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. "सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले" असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
"उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही (Eknath Shinde) मुलाखत घ्या" असा सल्ला दीपाली सय्यद यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिला आहे. "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी मुलाखत घेऊन त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होते. पण ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्याचप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे यांची मुलाखत घ्यावी. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे देखील सर्वांच्या समोर येईल" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
दीपाली सय्यद या आता दिल्लीमध्ये असून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह यांचीही वेळ पडली तर भेट घेऊ असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. दीपाली यांनी याआधी देखील अनेकदा ट्विट केलं आहे. "आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी चर्चा केली तर मार्ग निघेल" असं दीपाली यांनी म्हटलं होतं.
"अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र" असं दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी मोठं विधान केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं होतं. तसेच भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद असं म्हणत भाजपाचे देखील आभार मानले होते.
"येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.