"चुनाव आयोग हा आता भाजपाचा 'चुना लगाव' आयोग झालाय"; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:30 AM2024-03-10T11:30:38+5:302024-03-10T11:31:31+5:30
"भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनून काम करतंय"
Sanjay Raut on Election Commissioner Resignation: देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता पण त्यांनी आधीच राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला. निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात दोन आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच या आयोगात आहे. या साऱ्या घटनेनंतर, शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी चुनाव आयोगाला 'भाजपाचा चुना लगाव' आयोग असल्याचा टोला लगावला.
"निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलेला राजीनामा नाही. मूळात ती नेमणूकच अनैतिक होती. अशी व्यक्ती नैतिक कारणासाठी कशाला राजीनामा देईल. ज्यांनी नेमलं त्यांनीच त्यांना दूर केलं. त्याजागी आणखी एक नियुक्त व्यक्ती येईल. ते आता भाजपाचीच विस्तारित शाखा म्हणून काम करतायत असं वाटतं. शेषन यांच्या काळातला निवडणूक आयोग आता राहिलेला नाही. चुनाव आयोग हा सध्या भाजपाचा चुना लगाव आयोग झालाय", अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.
"निवडणूक आयोग हा भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या आदेशानुसारच काम करतोय हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल दिल्या गेलेल्या निर्णयांवरून स्पष्ट झाले आहे. पक्षांतरविरोधी कायद्याची मोडतोड करून आयोगाला काही निर्णय घ्यायला लावले. तेव्हा भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने धृतराष्ट्र बनून काम केले. निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा हा काही तरी मोदी-शाहांचा नवीन डाव असेल," असेही ते म्हणाले.