Sanjay Raut : "या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे असं वाटत होतं, पण..."; राऊतांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 10:34 AM2023-05-16T10:34:11+5:302023-05-16T10:45:17+5:30
Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेताना कोणतीही घाई मी करणार नाही; पण विलंबही करणार नाही. माझा निर्णय संविधानातील तरतुदी व कोर्टाच्या निर्देशानुसार असेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. "सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं पहिल्यापासून मत होतं. पण फडणवीसच असं बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"सध्या महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं झालं आहे. त्याला जबाबदार सध्याचं सरकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्य़ा पोपटाविषयी भाष्य केलं आहे. पोपट मेलेलाच आहे फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं आहे. शिंदे गटाचा पोपट हा मेलेला आहे. मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं पहिल्यापासून मत होतं. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. पण देवेंद्र फडणवीसच असं बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील."
"मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांना वकिलीचं चांगलं ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो, प्रशासन कळतं. राजरकारण माहितीय, पडद्यामागे काय चाललंय हे माहितीय तरी ते अशी वक्तव्य करताहेत म्हणजे त्यांची काहीतरी मला मजबूरी दिसतेय. सध्या महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं झालं आहे. त्याला जबाबदार सध्याचं सरकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. आपली बाजू मांडण्यासाठी काहींनी वेळ मागून घेतला आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ म्हणजे -‘रिझनेबल टाइम’ अशी व्याख्या अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. तसेच कोर्टाने दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना भेटून केली.