Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 01:02 PM2022-04-30T13:02:24+5:302022-04-30T13:02:36+5:30
Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.''
मुंबई: हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते सजंय राऊत(Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप जाती, धर्माच्या नावावर राज्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका राऊतांनी केली.
'...तर त्यांनाही पाण्यात बुडवावं लागेल'
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल,'' असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ''काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असंही ते म्हणाले.
'दोन घाव बसले तर...'
''शिवसेना कधीही समोरुन वार करते आणि छातीवर वार झेलते. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही, लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
'राज्याच्या बदनामीचा कट'
ते पुढे म्हणतात की, ''जशास तसं उत्तर देणं शिवसेनेचा स्वभाव आहे. आम्हाला त्याचं बाळकडूचं मिळालं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार आहे," असही राऊत म्हणाले.