Sanjay Raut : "बोम्मई रोज उठून कानफटीत मारतात अन् आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:12 PM2022-12-21T13:12:33+5:302022-12-21T13:23:53+5:30
Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच "मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमीन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही. तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील" असं म्हटलं आहे.
"मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यापूर्वी जी क्रांती केली आहे त्याचाच हा एक भाग कर्नाटकात दिसत आहे. तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. स्वत: च्या मुद्यावर तुम्ही तासभर बोलता. बाजुचे मुख्यमंत्री रोज बेअब्रू करतात. तुम्ही दोघे दिल्लीत गेलात तेव्हा गुंगीचे औषध दिले काय? तिकडून आले आणि गप्प ते गप्पच आहेत" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबतच लेचेपेचे सरकार आहे. ते घाबरले आहे. इथे आम्ही सर्व सीमा प्रश्नावर एकत्र आहोत. सर्व पक्ष एकत्र येऊ. तुम्ही सीमा प्रश्नावर भुमिकाच घेत नाही. मूग गिळून गप्प बसले असल्याचंही म्हटलं आहे.
"मांजर- बोक्याची वाटणी झाली आहे का?"
नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर न्यास जमिनीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही याच प्रकरणावरुन शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही रंग सफेदी कराल? भूखंड घोटाळा अतिशय गंभीर आहे तरीसुद्धा तुम्ही नाक वर करुन बोलत आहात. मला एक कळत नाही फडणवीस भ्रष्टाचाराच्या पाठिशी कशाला उभं राहत आहेत? यात काय तुमची मांजर-बोक्यासारखी वाटणी झाली आहे का?, असा सवाल उपस्थित कर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे 'खोदा पहाड और चुहा भी नही निकला' असा असल्याचं म्हटलं. यावरच संजय राऊत यांनी निशाणा साधला. "तुमचा निर्णय जर योग्य होता मग हायकोर्टानं स्थगिती का दिली याचं उत्तर द्या. बाकीचं काही सांगत बसू नका. तुम्ही किती रंग सफेदी कराल? घोटाळा झाला आहे आणि फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत? यात काय त्यांनाही वाटणी मिळालीय का? मांजर- बोक्याची वाटणी झाली आहे का?" असं संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"