Sanjay Raut : "मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:27 AM2023-02-21T10:27:30+5:302023-02-21T10:40:15+5:30
Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते" असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "थोरांचे विचार" असं लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये थोर राजकीय विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान नमूद करण्यात आलं आहे. "सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते" असं विधान या फोटोमध्ये असलेलं पाहायला मिळत आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
"धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा"
संजय राऊतांनी याआधीही गंभीर आरोप केला आहे. "धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असं म्हणत इशारा देखील दिला आहे. "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"देशातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं"
देशात आता न्याय आणि सत्याच्या बाजूनं निकाल दिला जात नाही. त्यामुळे जनतेच्या कोर्टात सत्याची बाजू मांडावी लागणार आहे आणि यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"