"जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा महाराष्ट्रात फडणवीसांवर; आणखी खूप काही पाहायचंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:10 AM2024-06-06T11:10:02+5:302024-06-06T11:12:30+5:30
Sanjay Raut on Devendra Fadnavis Resign: "महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा नाश देवेंद्र फडणवीस या वृत्तीने केला", असेही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Devendra Fadnavis Resign: "महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहेत. लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा राग महाराष्ट्रात फडणवीसांवर आहे. हातात असलेल्या सत्तेचा त्यांनी चुकीचा वापर केला. न्यायालयीन कामकाजावर दबाव आणला. पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी करण्यात आला. देवेंद्र फडणवीस हा नेता दिल्लीत जाऊन महत्त्वाची कामगिरी करू शकेल अशी आमच्या सारख्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांची सुरुवातीला भूमिका होती. पण पुढील काळात फडणवीसांनी सूडाचं, कपटी राजकारण केलं. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा देवेंद्र फडणवीस या वृत्तीने केला," असा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातही भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. देशात भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. राज्यातही भाजपाला खूप मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. यावर आज संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
राऊत पुढे म्हणाले, "फडणवीसांनी महाराष्ट्रात बदला घेण्याचे आणि सूडाचे राजकारण सुरु केले. त्यामुळे त्यांच्यावर आमचा राग असण्याचे कारण ते स्वत: आहेत. राज्याच्या जनतेने फडणवीसांना दाखवून दिलं की असं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. फडणवीसांनी राज्य करताना अनेकांना त्रास दिला. त्यामुळे तुमच्यावर रडण्याची वेळ आली. राज्य करण्याची ही पद्धत नव्हे. त्यांनी जे दोन पक्ष फोडले आणि त्यांनीच त्यांच्यावर जाहीरपणे रडण्याची वेळ आणली. अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहात."
"महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचे नाव काळ्याकुट्टं अक्षरात लिहिले जाईल. तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली. तुम्ही मराठी स्वाभिमानाची वाट लावली. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही फोडलीत त्याचा सूड महाराष्ट्र सातत्याने घेत राहिल," असा इशाराही त्यांनी दिला.