"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:44 PM2024-06-03T16:44:38+5:302024-06-03T16:46:01+5:30
Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंवर केलेल्या कारवाईचे स्वागतच, पण उद्या दुपारनंतर कळेल की कोण कोणावर कारवाई करतंय?"
Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईचे आम्ही स्वागतच करतो. पण नरेंद्र मोदी (Narendra Modi) ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का? मोदी ३० तारखेला १० कॅमेरे लावून ध्यानाला बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या २४ तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते. ती देखील नरेंद्र मोदी यांची 'मूक पत्रकार परिषद'च होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत. आयोग ध्यानस्थ बसले होते, तपस्येला बसले होते. काय कारवाई होते, ते पाहू... उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल की कोण कोणावर कारवाई करतंय?" अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आज दिले. ठाकरे यांनी २० मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या विरोधात मुंबई भाजपाकडून आयोगाकडे तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल पुढे बोलताना संजय राऊत यांनी १७ पत्रांचा उल्लेख केला. "भाजपाला मतदान करा, रामललाचे फुकट दर्शन करायला मिळेल अशी प्रलोभने देणारी भाषण भाजपाकडून केले गेले. याबद्दलचे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले होते. पण त्याची साधी पोचपावती पण आम्हाला मिळालेली नाही. आम्ही एकूण १७ पत्रे पाठवली. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा गैरवापर कसा सुरु आहे याबद्दल काही पत्रे होती. निवडणुकीत पैसा वाटप सुरु असल्यावरूनही पत्रे होती. त्यावर कारवाई झालेली दिसली नाही. पण उद्धव ठाकरेंनी २० मे रोजी पत्रकार परिषद घेतली. त्याबद्दल भाजपाने आयोगाला पत्र पाठवले आणि आयोगाने कर्तव्यदक्ष्य, कर्तव्यतत्परता दाखवत कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचे स्वागत करतो. निवडणूक आयोग ही भाजपाची विस्तारित शाखा आहे, ती निष्पक्ष नाही, घटनेनुसार काम करत नाही. उद्या संध्याकाळनंतर त्यांना या सगळ्याची उत्तरे द्यावी लागतील," असे संजय राऊत म्हणाले.