पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:44 PM2020-09-04T13:44:14+5:302020-09-04T13:50:25+5:30
महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
मुंबई : मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
याचबरोबर, मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर जी लोकं मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. त्या पक्षाला मुंबईत मतदान मागण्याचा अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला. तसेच, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?” असा सवाल संजय राऊत यांनी भाजपा आमदार राम कदम यांना विचारला आहे.
याचबरोबर, राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणे हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेले आहे, हे स्पष्ट दिसत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.