Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 13:43 IST2020-10-31T12:50:08+5:302020-10-31T13:43:20+5:30
महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता..

Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "
पुणे : महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता. परंतू, माझ्यासारख्या काही लोकांना राज्यात सत्तांतर होऊन याप्रकारे तीन पक्षांचे मिळून सरकार बनवता येईल असे खात्रीपूर्वक वाटत होते. आणि तसे करून देखील दाखवले. यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे. आणि आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असे ठाम मत नोंदवताना शिवसेनेचे खासदार व महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार संजय राऊत यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले; आमच्यासाठी मधला काही काळ परीक्षा पाहणारा होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यांच्या नेतृत्त्वात या संकटांचा आम्ही उत्तमप्रकारे सामना केला. बाकीच्या राज्यांमध्ये गेला तर त्याचं महत्त्व पटेल. तिथे कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही. उद्धव यांनी कोरोना संकटाशी लढताना सक्षमपणे नेतृत्व केलं त्यामुळे आपले कमी नुकसान झाले. अन्यथा अराजकता निर्माण झाली असती.
राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता पुणे..
राज्याच्या राजकारणात पुणे नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत ते मुंबई होते. अनेक वर्ष देश आणि राज्य पातळीवरचे राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होते. आता बरेच प्रमुख राजकीय नेतेमंडळी पुण्यात आहेत,” असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
...
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही....
महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. उत्तम राज्य कारभार चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.