"संजय राऊत झोपेच्या गोळ्या घेतात अन् स्वप्न बघतात"; भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:06 PM2022-07-28T22:06:19+5:302022-07-28T22:14:58+5:30
"एकनाथ शिंदे म्हणालेत तुमच्यासोबत येतील त्यांना घेऊन जा, पण तुमच्यासोबत कोणी आलं तर पाहिजे ना.."
BJP vs Sanjay Raut शिर्डी: शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला. राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झालं तर नवल वाटू देऊ नका, असं वक्तव्य त्यांनी केलं. या विधानावरून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राऊतांना चांगलंच सुनावलं. 'सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे', असे अजितदादा म्हणाले. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनीही संजय राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. राऊतांना आता झोप लागत नाही. त्यामुळे ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि स्वप्न पाहतात, असा टोला भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.
"संजय राऊतांना हल्ली झोप लागत नाही. ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि स्वप्न बघतात. आमदार, खासदार मंत्रालयात गेले नाहीत तर त्यांच्या भागाचा विकास होईल का? महाराष्ट्राच्या विकासाला निधी लागणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. महाविकास आघाडीने अडीच वर्षे सत्यानाश केला. आम्हाला आता ट्वेंटी-ट्वेंटी खेळून पाच वर्षाचा विकास दोन वर्षात भरून काढायचा आहे. त्यासाठी केंद्राची मदत लागणारच आहे", असे बावनकुळे म्हणाले.
"तुम्ही कधी दिल्लीवर विश्वास ठेवला नाहीत, त्यामुळे तुम्ही दिल्लीत गेला नाहीत. शिंदे-फडणवीसांची दिल्ली वारी केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी सुरू आहे. आमदार, खासदार सोडून गेले तरी तुमची मुजोरी कायमच आहे. एकनाथ शिंदेंनी मागेच सांगितलं की यातला जो यायला तयार असेल त्याला घेऊन जा. मात्र, तुमच्यासोबत कुणी यायला तर पाहिजे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आता आत्मचिंतनाची वेळ आली आहे. चुका सुधारण्याऐवजी आमदारांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. त्याचाच फटका शिवसेनेला बसतोय", असेही ते म्हणाले.