संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:31 AM2023-01-11T10:31:38+5:302023-01-11T10:32:10+5:30
विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं.
मुंबई - हसन मुश्रीफ विरोधी पक्षात आहेत. जे एका विचारधारेविरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडतायेत. अनेकांना अटक झाली. हसन मुश्रीफांना तुरुंगात टाकण्याची भाषा काहींनी केली होती. ही भाषा भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याबाबतीतही झाली होती. परंतु ते सत्तेत गेल्याने त्यांना दिलासा मिळतो. विरोधकांवर दबाव टाकण्याचं राजकारण केले जाते. हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते. काल सुप्रीम कोर्टात मी स्वत: होतो. सुनावणी झाली. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला त्यानंतर १४ फेब्रुवारी तारीख दिली. कोर्टात कामाचा फार लोड असतो. निवडणूक आयोगासमोरही सुनावणी झाली. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. स्वायत्त संस्थांवर राजकीय दबाव आहे. त्याचा ताणतणाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. पक्षपात आणि नि:पक्षपात हे नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते. देशातील वातावरण फारसं निर्मळ आणि स्वच्छ राहिले नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत देशात २० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिमांची आहे. इतर धर्मीयही लोक राहतात. जर निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करण्यासाठी हिंदू-मुस्लीम असा वारंवार वापर केला तर देश पुन्हा एकदा तुटेल. पुन्हा विभाजनाची स्थिती निर्माण होईल. लोकांच्या मनात भीती निर्माण करून तुम्ही जास्तकाळ राजकारण करू शकत नाही. मोहन भागवत यांनी जे विधान केले त्यावर भाजपा नेत्यांनी विचार करायला हवा असंही संजय राऊत म्हणाले.
शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे होणार नाहीत
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यासमोर एक विधान केले. त्यावर सामनानं अग्रलेख लिहिलाय. महाजन काय म्हणाले, शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते, ते आम्ही पूर्ण केले त्याचा आम्हाला आनंद आहे. हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केले. हे गंभीर आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळे, आम्ही हा निर्णय राष्ट्रवादी आणि शरद पवारांमुळे घेतला हा दावा वारंवार फुटीर गटाकडून केला जातोय. त्यावर गिरीश महाजनांनी पडदा टाकला. शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपाला संपवायची होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे करता येणार नाहीत. शिवसेना फोडल्याशिवाय त्यात अडथळा येणार नाही असं महाजनांना सूचवायचं होते. भाजपाच्या एका नेत्याने सत्य सांगितले त्याबद्दल गिरीश महाजन यांचे आभार मानतो असा घणाघातही राऊतांनी भाजपावर केला.