“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:12 PM2023-05-31T17:12:58+5:302023-05-31T17:13:28+5:30

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

sanjay raut taunt cm eknath shinde and dcm devendra fadnavis | “CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले?

“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले?

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काळजी वाटते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारमधील लोक चिंतेत आहेत. राज्य सरकारला भिती आहे. हे सरकार पडण्याची त्यांना चिंता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा, सतत तणावात असतात. कारण हे झोपतच नाहीत. झोपच उडाली आहे यांची. चेहरे बघा त्यांचे. मला दया येते यांची, एक माणूस म्हणून मला काळजी वाटते, माणुसकी म्हणून चिंता वाटते, कारण ते सतत चिंतेत असतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

हे सगळे थांबवले पाहिजे

देवेंद्रजींचा चेहरा बघा, कसा ओढलेला आणि तणावग्रस्त असतो. कारण झोपत नाहीत, सतत तळमळत असतात, तडफडत असतात, उद्याच्या भविष्याच्या चिंतेने तडफडत असतात हे स्पष्ट दिसते त्यांच्या चेहऱ्यावर. मला चिंता वाटते की, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. ही रात्रीची जागरणे, पहाटेपर्यंत जागे राहणे, वेषांतर करून बाहेर जाणे, हे सगळे थांबवले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, शिवसेना पक्षाचा येत्या १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. भाजपने शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून ठाकरे गटाला टोला लगावला. यावर बोलताना, भाजपने उठाठेव करायची गरज नाही. त्यांनी आमचे वकीलपत्र कधी घेतले? शिवसेनेचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करू. शिवसेना ही ठाकरे यांची आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. त्याआधी १८ जून रोजी शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन आहे. संपूर्ण राज्यातून या अधिवेशनला शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते येतील. या अधिवेशनात शिवसेनेची पुढची दिशा ठरेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.


 

Web Title: sanjay raut taunt cm eknath shinde and dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.