"कब तक छिपोगे गोहातीमे...", झिरवाळांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचे खोचक ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:39 AM2022-06-26T08:39:58+5:302022-06-26T10:27:06+5:30
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दररोज ट्विट आणि माध्यमांसमोर येऊन बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसून येत आहेत.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. आज राज्यातील सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दररोज ट्विट आणि माध्यमांसमोर येऊन बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसून येत आहेत. आज सुद्धा संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. "कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे...", असे म्हणत संजय राऊत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही फोटो पोस्ट केला आहे.
कब तक छीपोगे गोहातीमे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO
या ट्विटमध्ये नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला भन्नाट फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान, कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईत यावे लागेलच, असा इशाराच या ट्विटद्वारे संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षातूनच आव्हान मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे.