Sanjay Raut: 'तुम्हाला हे अधिकार कुणी दिले?', राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं; ठाकरे-शिंदे भेटीचं केलेलं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:48 AM2022-07-17T10:48:16+5:302022-07-17T10:48:49+5:30
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवी दिल्ली-
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असल्याचं ट्विट करुन दिपाली सय्यद यांनी नवा ट्विस्ट राज्याच्या राजकारणात आणला. दिपाली सय्यद यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राऊत यांनी थेट दिपाली सय्यद यांना विचारपूर्वक ट्विट करण्याचा सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार
"दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे", असं संजय राऊत म्हणाले. ते नवी दिल्लीत एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
"शिंदे गट एकत्र येईल की नाही हे येणारा काळ ठरवेल. एकत्रित यावं असं आम्हाला का वाटणार नाही. कारण ते आमचेच सहकारी आहेत. आमचेच मित्र आहेत. ते आज माझ्यावर टीका करत असले तरी ती त्यांची मजबुरी आहे. भाजपामुळे त्यांच्यावर मजुबरी ओढावली आहे. तरीसुद्धा गेली अडीच वर्ष ते आमच्यासोबत सत्तेत होते. त्यांच्या अनेक अडचणी, कामं आम्ही एकत्र केली आहेत. त्यामुळे एकत्रित यावं असं का वाटणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावरुन लगावला टोला
"आमचे सात मंत्री होते. पण इथं तर दोनचं मंत्री काम करत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत यांच्यात चर्चा होत आहे. सरकार घटनाबाह्य असल्याची भीती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जात आहे. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळेच शपथविधी होऊ शकलेला नाही. आता तुम्ही घटना तुडवायची ठरवलंच असेल तर ती तुमची मर्जी", असं संजय राऊत म्हणाले.