संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 01:10 PM2023-04-27T13:10:21+5:302023-04-27T13:11:19+5:30
Sanjay Raut News: देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut News: पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच एक मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहे. त्यात जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनाही भेटणार आहे. पुलवामाबाबत त्यांनी जे काही खुलासे केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो संपूर्ण विषय देशात पोहचू नये, यासाठी माध्यमांवर दबाव आणण्यात आला. पुलवामा हत्याकांडात काही गरबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवा. सत्यपाल मलिक हे महत्त्वाचे नेते आहेत. ते सध्या सक्रिय आहेत. देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
स्वयंभू असतात त्यांच्या मागेच जनता जाते
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावरही उत्तरे दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला राज यांनी लगावला होता. या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही स्वयंभूच आहोत. जे स्वयंभू देव असतात त्यांच्या मागेच जनता जाते. जे शिंदुर फासतात त्यांच्यामागे जनता जात नाही. याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सांगा आमच्यातकडे औषध आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, विरोधी पक्ष कधी सुट्टीवर जात नाही पण मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी लगावला. आम्हाला मतदान करा नाहीतर दंगली होती अशा प्रकारच्या धमक्या देणे देशाच्या गृहमंत्र्यांना सोबत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"