संजय राऊतांना अटक ही तर 'श्रींची' इच्छा; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:43 PM2022-08-01T16:43:34+5:302022-08-01T16:44:03+5:30
Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुंबई : मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी कधीही वंचितांचे- बेरोजगारांचे- शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचे मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाहीत. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत महिलेलाही अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव संजय राऊतांना होता. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. याशिवाय, मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची होती. ती देखील त्यांनी अडवली. सरकारी वकिलाकरवी कट रचून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी
दरम्यान, संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज त्यांना सत्र न्यायालयात हजर केले. कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीने रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केले. जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.