मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 13:56 IST2020-01-15T13:45:04+5:302020-01-15T13:56:21+5:30
लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आतापर्यंत समोर न आलेल्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला.

मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित
पुणे - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिले आहे. मी त्याला पाहिलंय, त्याच्याशी बोललोल. एकवेळ त्याला दमसुद्धा दिला होता, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. एकेकाळचा कुख्यात गुंड, अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला इंदिरा गांधी भेटत असत, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
आज पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी आपली पत्रकारिता आणि राजकारणाबाबत आतापर्यंत समोर न आलेल्या आठवणी उघड केल्या. यावेळी आपल्या पत्रकारितेतील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना राऊत म्हणाले की, ''माणसामध्ये हिंमत असली की समोर प्रधानमंत्री,गृहमंत्री असले तरी फरक पडत नाही. आतापर्यंतच्या आयुष्यात मी मृत्यूला आणि तुरुंगाला कधी घाबरलो नाही. काही जण मला गुंड म्हणतात, पण मला त्याचे वाईट वाटत नाही. ही माझ्या कामाची पद्धत आहे.''
''एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आताअंडरवर्ल्डचं अस्तित्व काहीच राहिलं नाही, आधी कोण मुख्यमंत्री होणार, कोण सरकारमध्ये येणार हे अंडरवर्ल्ड ठरवायचे. अशा त्या काळात मी अंडरवर्ल्डच्या अनेक लोकांना पाहिलंय. मी दाऊदपासून सगळ्यांचे फोटो काढले आहेत. आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिलंय, त्याच्याशी बोललोल. एकवेळ तर त्याला दमसुद्धा दिला होता,''असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.