...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:50 AM2024-02-25T10:50:37+5:302024-02-25T10:51:13+5:30
लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय असं राऊतांनी सांगितले.
मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) २७ तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे. आम्ही अत्यंत सन्मानाने वंचित बहुजन आघाडीला चर्चेला बोलावले आहे. जागावाटपाची चर्चा एकत्र होईल. आधी ३ पक्षांनी जागावाटप करावे आणि त्यानंतर आम्हाला हव्या त्या जागा आम्ही मागून घेऊ अशी त्यांची भूमिका आहे. परंतु अशाप्रकारे जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही. आंबेडकरांना राजकारण उत्तम कळते, त्यांना भूमिकाही कळतात. त्यांना कुठल्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही त्यांच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा करू. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला मविआचा घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेतले. त्यामुळे मविआच्या बैठकीत ते सहभागी होतात. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेतही ते सहभागी होतात. या देशात संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सगळे संघर्ष करतोय. मोदी-शाह यांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी ज्यांचे एकमेकांसोबत मतभेद आहेत हे पक्षही काँग्रेससह एकत्रित आलेत असं त्यांनी सांगितले.
तसेच उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायचीय. प्रकाश आंबेडकर हे मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत हा विश्वास आहे. कारण देशातील संविधान वाचवणे ही आमच्या इतकीच त्यांची जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना, लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय. आमच्या बैठकीत ते सहभागी होतात. प्रकाश आंबेडकर यांच्या त्यांच्या भूमिका जाहीरपणे मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे असं राऊतांनी स्पष्ट केले.
...तर देशच भाजपामुक्त होईल
सध्याचा मोदी-शाह यांचा भाजपा पक्ष हे कुठलीही लोकशाही आणि देशाचे संविधान मानायला तयार नाहीत. छोटे पक्ष संपवा हे बावनकुळेंचे विधान केले, ही लोकशाही त्यांच्या बापजाद्याने आणलीय का? काही वर्षापूर्वी जे.पी नड्डा यांनी याच प्रकारे विधान केले. या देशात केवळ एकच पक्ष राहील तो भाजपा, हे हुकुमशाहीची भाषा होती. आज जे.पी नड्डा आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतायेत. अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष यांना घेऊन एनडीए उभारावी लागते. २०२४ मध्ये तुमचा पक्ष राहतोय का हे पाहावा. भाजपा पूर्ण काँग्रेसमय झालेला आहे. जे लोक गेलेत त्यांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजपा खाली होईल. ३०३ खासदारांपैकी केवळ ११० खासदार मूळ भाजपाचे आहेत. बाकी सर्व इतर पक्षातून आलेले आहेत. या आमदार, खासदारांनी भाजपा सोडायचा निर्णय घेतला तर हा देशच भाजपामुक्त होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला.
भाजपाची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक
आजही भाजपाला त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील प्रमुख लोकांची गरज लागते. तुम्ही इतकी वर्ष का उपटत बसला होता? आम्ही याला संपवू, त्याला संपवू ही जी तुमची ताकद आहे ती परावलंबी आहे. लहान पक्ष संपवू हीच तुमची भूमिका हुकुमशाहीच्या दिशेने नेणारी आहे. या देशात लोकशाही संपवायची, लहान पक्षांना संपवायचे, मोठ्या पक्षांना फोडायचे ही भाजपाची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक आहे. या देशातून लोकशाही नष्ट करायची, लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र हिसकावयचे, निवडणुका घेणे बंद करायच्या या भाजपाच्या धोरणाविरोधातच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. २०२४ च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवतंय, जनता कुणाला गाडणार हे कळेल. त्यामुळे बावनकुळेंनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावे असा घणाघात संजय राऊतांनी भाजपावर केला आहे.