बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देशातील एकमेव नेते जे...; संजय राऊतांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:00 PM2023-07-25T12:00:45+5:302023-07-25T12:01:21+5:30
राज्यात दरडी कोसळतायेत, निधीवाटपात अपहार सुरू आहे. त्यावर चर्चा करा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची मुलाखत शांतपणे बसून ऐका आणि वाचा असं माझं विरोधकांना आवाहन आहे असंही राऊतांनी सांगितले.
मुंबई – उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा विरोधकांनी धसका घेतलाय, त्यामुळे सुरसुरी वाजत आहे. त्यामुळेच मुलाखतीवर टीका करतायेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देशातील पहिले नेते आहेत ज्यांच्या मुलाखतीची चर्चा मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच सुरू आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना संपवलं, शिवसेनेला संपवलं असं जे बोलतायेत त्यांच्याच पोटात उद्धव ठाकरे बोलू लागतात तेव्हा गोळा येतो अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंची मुलाखत अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. लगेच टीका करायला यांना काय झाले? ऐका, पाहा, समजून घ्या ते काय म्हणतायेत. एक ओळही प्रसिद्ध झाली नाही. विरोधकांना दुसरे काम नाही का? विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. राज्यात दरडी कोसळतायेत, निधीवाटपात अपहार सुरू आहे. त्यावर चर्चा करा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची मुलाखत शांतपणे बसून ऐका आणि वाचा असं माझं विरोधकांना आवाहन आहे असंही राऊतांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला अर्थ नाही
देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यावर आमचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विधानसभा अध्यक्षही नाहीत. आम्ही सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा आमचे बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे तंतोतंत पालन केले तर देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाईल. कारण सुप्रीम कोर्टाने जे निष्कर्ष काढले आहेत ते बदलता येणार नाही असंही राऊतांनी म्हटलं.
मोदी झाले मौनीबाबा
२०१४ च्या आधी मोदी आणि त्यांच्या टीमने मनमोहन सिंग यांच्यावर मौनीबाबा म्हणून टीका करायला सुरुवात केली. परंतु देशात आज इतके काही घडतंय त्यात आजचे पंतप्रधान मौनीबाबाचं रुप धारण करून बसलेत. गृहमंत्री चर्चेला उत्तर देतील पण देशाचा इतका मोठा भाग जळतोय, राज्य हातातून जाताना दिसतंय मग तुम्ही काश्मीरवर बोलता मणिपूरवर का बोलत नाही. महिलांची नग्न धिंड तुम्हाला वेदना देत नाही का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला केला.