"संजय राऊतांचं ‘ते’ विधान म्हणजे शरद पवारांची स्क्रिप्ट; उबाठा गटाला आघाडीतून काढायचंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:55 PM2023-08-14T13:55:22+5:302023-08-14T13:56:24+5:30
संजय राऊत स्वत:ची तुलना महात्मा गांधीशी करतायेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका शिरसाट यांनी केली.
मुंबई – शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय असं राऊत म्हणातात. पण खरेतर शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट संजय राऊत बोलतात. उबाठा गट महाविकास आघाडीत नकोय. त्यासाठी संजय राऊतांनी टाकलेली ही गुगली आहे. आम्ही शिंदेंसोबत चहापान केले तर काय संदेश जाईल असं विधान त्यांनी केले. राऊतांचे विधान म्हणजे उद्धव गटाला महाविकास आघाडीतून बाजूला सारायचं ही पवारांची स्क्रिप्ट आहे असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलले त्याचा प्रत्यत भविष्यात येईल. संजय राऊत उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन बोलतात हे चुकीचे आहे. शरद पवार जे बोलतात त्यांचे काम संजय राऊत करतात. उबाठा गट सध्या अखेरचा श्वास घेतायेत तो काढून घ्यायचा आहे. संजय राऊतांनी सुपारी घेऊनच महाविकास आघाडी केली आणि सुपारी घेऊनच महाविकास आघाडी तोडणार आहे. राऊतांचे विधान हे उद्धव ठाकरे गटाने बाजूला जावे यासाठी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच संजय राऊत स्वत:ची तुलना महात्मा गांधीशी करतायेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. महाराष्ट्रातल्या राजकारणातील विदूषक म्हणून संजय राऊतांकडे पाहा. त्यांच्या विधानाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही जे करतो ते छातीठोकपणे करतो. गुप्त भेटीमुळे आमचा बीपी वाढेल अशी विधाने करू नका, ज्यांचा बीपी वाढलाय ते घरी बसलेत. शरद पवार-अजित पवार भेटीने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बीपी वाढलाय. या भेटीचा आम्हाला त्रास नाही तर मविआ नेत्यांना झाला आहे. आम्ही या घटनेचा आनंद घेतोय असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, अमित शाह, देवेंद्र फडणवीस तर कधी नरेंद्र मोदींच्या स्टेजवर शरद पवार असतात. आघाडीत काय घडणार याची कल्पना मविआ नेत्यांना आली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडूनच वेगवेगळी विधाने बाहेर येत आहे. येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. जे जे आम्हाला गद्दार, खोके बोलत होते तेच आमच्यासोबत येतील. भंपकबाजी करण्यापेक्षा ठाकरे गटाने उरलासुरला पक्ष शिल्लक आहे त्याकडे लक्ष द्यावे असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना लगावला आहे.