Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:21 PM2022-07-23T20:21:18+5:302022-07-23T20:22:47+5:30

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

sanjay raut's statements do not make MLAs split, raj thackeray reaction on maharashtra political crisis | Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झाले नसते, असे सांगत संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी  लगावला. ते झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेच आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचे तुम्ही श्रेय कसे काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, जे काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि सगळ्यांनी संजय राऊत यांना झोडून काढले. यामध्ये संजय राऊत यांचा काय संबंधं? मी समजू शकतो रोज ते टेलिव्हिजनवर यायचे, रोज काही ना काही बोलायचे, ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. पण संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, असेही राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सामना सुरु केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो. तेव्हा त्याचा प्रचंड खप होता. आज मार्मिक किती लोक वाचतात? कोणीच नाही, कारण त्यात बाळासाहेब नाहीत. तशीच अवस्था या शिवसेनेची झाली आहे. नशिबाला जर कोणी यश म्हणत असेल तर त्याचा ऱ्हास सुरु होतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका केली. तसेच, बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हतं. शिवसेना एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने माणसं बांधली गेली होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर बंडखोरी झालीच नसती, असेही राज ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, मुख्यमंत्री पद आपल्याला दिले नाही, असा आव शिवसेना नेत्यांनी आणला. उद्धव ठाकरे शेजारी बसलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे म्हटले होते. त्यानंतर अमित शहा यांनी देखील भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी का आक्षेप घेतला नाही. तेव्हा का नाही ते बोलले. जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा यांना आठवले का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

Web Title: sanjay raut's statements do not make MLAs split, raj thackeray reaction on maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.