‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:23 PM2023-03-03T18:23:02+5:302023-03-03T18:23:18+5:30
सांगलीत भाषणादरम्यान संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.
सांगली: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सत्तधाऱ्यांनी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. यातच आता राऊतांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला (Election Commission of India) उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.
संजय राऊतसांगलीच्या दौऱ्यावर होते, यावेळी ते म्हणाले की, 'मी खूप वर्षांनी सांगलीत आलोय. रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी माझे स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले, हे आता परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की, जगात इतर कुठली गोष्ट इतकी लोकप्रिय झाली नाही. आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण 50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलंय', अशी टीका राऊतांनी केली.
ते पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांविषयी बोलणं योग्य नाही, पण जर जनतेच्या भावना असतील तर काय करणार. संघर्ष करणारा शिवसैनिक आहे. स्वतः उपाशी राहून तुम्हाला आमदार-खासदार केलं. खरे शिवसैनिक इथेच आहेत आणि निवडून दिलेले 50 खोके घेवून पळून गेले. आता निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे. अरे तुमच्या बापाची आहे का भो***. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही,'अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात, 'चाळीस चोरांनी आणि दिल्लीच्या रंगा बिल्लांना काय वाटतं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. पण, शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचंय. जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले, त्यावेळी काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. भाजपने पाठीत खंजीर खपूसलं. हे भांडण 40 चोरांशी नाही, भाजपशी आहे', असंही ते म्हणाले.