संजय रायमुलकर यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द !
By Admin | Published: January 20, 2016 02:25 AM2016-01-20T02:25:57+5:302016-01-20T02:25:57+5:30
सेनेच्या आमदारास विभागीय जात पडताळणी समितीचा धक्का; राखीव प्रवर्गातील लाभ काढून घेण्याचा आदेश.
अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचे बलाई जातीचे प्रमाणपत्र रद्द करुन शासनजमा करण्याचा आदेश अकोल्याच्या विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ.रायमुलकर यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने, त्यांना देण्यात आलेले लाभ जिल्हाधिकार्यांनी तातडीने काढून घ्यावेत, असे आदेशही समितीने दिले. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय भास्करराव रायमुलकर यांची जात सुतार असताना, त्यांनी बलाई जातीचे प्रमाणपत्र सादर केले. याबाबत बुलडाणा येथील अँड.साहेबराव अश्रूजी सरदार आणि ९ जणांनी अकोल्याच्या विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सन २00९ मध्ये अपील दाखल केले होते. या प्रकरणात विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने ३१ डिसेंबर २0१५ रोजी निर्णय पारीत करण्यात आला. त्यानुसार आ.संजय रायमुलकर यांचा बलाई जातीचा दावा अमान्य करण्यात आला असून, तक्रारदार अँड.साहेबराव सरदार व इतर ९ जणांची तक्रार ग्राह्य धरण्यात आली. जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी याबाबत निकाल देताना, आ.रायमुलकर यांना बुलडाणा उपविभागीय अधिकार्यांनी २00६ साली दिलेले बलाई जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवून ते शासनजमा करण्याचा आदेश दिला. आ.रायमुलकर हे अनुसूचित जातीसाठी राखीव प्रवर्गातून निवडून आल्याने आणि त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने त्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्याबाबत बुलडाणा जिल्हाधिकार्यांनी तातडीने कारवाई करण्याचा आदेशही विभागीय जाती प्रमाणपत्र समितीने दिला. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ७ विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी दोन मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत.