संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:45 PM2024-10-07T14:45:27+5:302024-10-07T14:46:30+5:30
आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले.
मुंबई - पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील अशी ऑफर भाजपाने दिली होती. मात्र तरीही ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. एकनाथ शिंदेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं ठरलं, त्यावेळी आम्ही सगळे मातोश्रीवर होतो. आम्ही डोळ्यासमोर पाहत होतो. २०१९ ला निकालात शिवसेना-भाजपा बहुमत आले होते. सर्वकाही ठरले होते, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद यावरही भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमची हे मान्य केले. परंतु कुणीतरी एक जण चर्चेला पाठवा. परंतु चर्चेला माणूस पाठवला नाही. तुला जायचं तर तू जा असं एकनाथ शिंदेंना म्हटलं. हे सर्व आधीच ठरले होते, भाजपासोबत जायचंच नाही मग इतका आटापिटा कशासाठी केला होता असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला. पदासाठीच हे सर्व केले, त्याला कारणीभूत संजय राऊत असा आरोपही शिरसाटांनी केला.
तर संजय शिरसाट यांच्यासारखा बदमाश माणसाने सांगावे, त्यावर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा. ही माणसे गुवाहाटीला गेली, वेगवेगळी कारणे देऊन बाहेर पडली. एकही कारण लोकांना पटत नाही त्यामुळे अशा वाचाळवीरांवर बोलू नये. बोलण्याचे संकेत ज्यांना कळत नाही एखाद्या खासदाराला एकेरी बोलू शकतात त्यावर न बोललेले बरं असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटांना लगावला आहे. एबीपीनं याबाबत वृत्त दिले आहे.
परतीचे दोर कापायला तुमच्याकडे येणार कोण?
परतीचे दोर कापायला तुमच्याकडे कुणी आले पाहिजे, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे लाचारांची फौज तयार झालीय. प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरू आहे. जो पक्ष डुबतोय त्याकडे कुणी जात नाही. एखादा नगरसेवक, कार्यकर्ता गेला तोदेखील उमेदवारीचं तिकीट घेऊन, त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही. लाचारांची ही फौज तयार झालीय. शिवसेनाप्रमुखाच्या स्वाभिमानाची फौज होती ती आता नाही. हे केवळ लाचारी करून पदरात काय पडेल ते घेणे एवढेच उबाठाचे काम आहे. येणारी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
महायुतीत वाद नाहीत, बच्चू कडू अंहकारी बनलेत
निवडणुकीच्या काळात काही जागा मागितल्या जातात पण मागणी केली म्हणून जागा सोडल्या असं होत नाही. वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. बच्चू कडू यांनी असं बोलणं योग्य नाही. ते अहंकारी भाषेत बोलायला लागलेत. आम्ही जेव्हा उठाव केला तुम्ही आमच्यासोबत आलात. प्रत्येक पक्षात कुणीतरी येते आणि जाते तुमचा माणूस तुम्हाला का सांभाळता आला नाही हे चिंतन करा असंही शिरसाटांनी सांगितले.