Sanjay Shirsat : "आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं"; बंडखोर आमदाराने फेटाळला उद्धव ठाकरेंचा आरोप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:06 AM2022-07-26T11:06:10+5:302022-07-26T11:15:25+5:30
Sanjay Shirsat Slams ShivSena Uddhav Thackeray : "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावर आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - "सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले" असे भावनिक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Uddhav Thackeray) यांनी काढले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्धव ठाकरेंनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.
बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. "उद्धव ठाकरे हे आजारी असताना बंड केलं असं म्हणाले हे साफ खोटं आहे" असं म्हटलं आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी असं म्हटलं आहे. तसेच "सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं आहे. मी आजारी असताना घडलेला हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असं आम्ही म्हटलं. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
"साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले"
संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नेते आहे. बाळासाहेब ठाकरे मोठे झाले ते उद्धव ठाकरेंना पाहावत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको असं कुणी म्हटलं तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही. शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख तुम्हीही होऊ शकत नाही
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.
आज ज्यांना सडलेली पानं, गळालेली पानं बोलता त्यांनी सावली दिली होती. मनोहर जोशी, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर यासारख्या माणसांनी शिवसेना गावागावात रुजवली. झाडाला आलेली पानं सडली त्यांना उचलून कचऱ्यात टाकलं हे विधान खूप दु:ख देणारे आहे. लीलाधर डाके, सुधीर जोशी एखाद्याचं काम संपलं म्हणून त्यांना कचऱ्यात टाकलं हे म्हणणं कितपत योग्य आहे. गळालेली पान्यातून खतनिमिर्ती होते. त्यातून नवा अंकुर उभा राहतो हे त्यांना माहिती नाही असा टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.