राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:23 PM2024-11-05T13:23:11+5:302024-11-05T13:23:48+5:30
"कालचे राज ठाकरे यांचे भाषण आपण सत्यवचनी म्हणतो, तसे भाषण झाले. आमचेही तेच मत आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे..."
आता फोडाफोडीचे राजकारण राहिले नाही, आता पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचे हे पहिल्यांदाच बघितले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदे यांची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, असे विधान राज ठाकरे यांनी डोंबिवलीत राजू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले होते. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संयज शिरसाट यांनी भाष्य केले आहे. कालचे राज ठाकरे यांचे भाषण आपण सत्यवचनी म्हणतो, तसे भाषण झाले. आमचेही तेच मत आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
आमदार शिरसाट म्हणाले, "काल राज ठाकरे यांनी जे भाषण केले, ते अत्यंत सत्यवचनी म्हणतो आपण, तसे भाषण झाले आहे. आमचेही तेच मत आहे. ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची आहे, हा धनुष्य-बाण शिवसेना प्रमुखांचा, हिंदुत्वाचा विचार हा शिवसेना प्रमुखांचा आणि आम्ही केवळ तो पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे एक पाईक आहोत. शिवसेने आमची नाहीच, शिवसेना शिवसेना प्रमुखांची आहे. म्हणून राज ठाकरे जे काही बोलले ते सत्य बोलले आहेत."
मी ज्या पक्षात काम करतो, आम्ही ना पहिल्या दिवसांपासून शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले, ना शिवसेना प्रमुखांचा धनुष्य-बाण सोडलाय, ना आमच्या पैकी कुणीही, ही शिवसेना आमची आहे अथवा आम्ही निर्माण केली आहे, असे वक्तव्य कधीही कुठेही केलेले नाही. ही शिवसेने शिवसेना प्रमुखांचीच आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्ही या महाराष्ट्रात घौडदौड करत आहोत.
...हीच का लाडकी बहीण योजना? -
मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय, हीच का लाडकी बहीण योजना? असा सवाल करत, राज यांनी आपल्या डोंबिवलीतील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, "आता भोजपुरी गाण्यावर नाचली की मराठी गाण्यावर नाचली, हा प्रांतवाद आता काढण्याची कसलीही आवश्यकता नाही. आम्हाला महाराष्ट्रात सर्व जाती धर्माची संस्कृती एका व्यासपीठावर आणायची आहे. काही लोक जेव्हा पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढतात, त्यावर टीका केली असती, तर ती अधिक सार्थक ठरली असती. मुसा नावाचा अतिरेकी, गँगस्टर आहे, तो त्या रॅलीत येतो, त्यावर टीका केली असती, तर बरे झाले असते. मला वाटते की, तो राष्ट्रीय मुद्दा असू शकतो. नाचणे...गाणे..., आता छटपूजेला आपणही जाता, आम्हीही जातो. म्हणून संस्कृती बदलली, अशातला भाग नाही. संस्कृती जपायचेही काम करायला हवे. मात्र देशाच्या मुळावर जे उठले आहेत ना, त्यांना विरोधकरणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे."