ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद; देहूतील विठ्ठल मंदिर देखील बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:17 PM2020-03-17T17:17:28+5:302020-03-17T17:54:13+5:30
माऊलींचे संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची इतिहासातील पहिलीच वेळ
आळंदी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थानने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच देहूृतील विठ्ठल मंदिर देखील २३ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज देवस्थानने घेतला आहे. विशेष म्हणजे माऊलींचे मंदिर बंद ठेवण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या काळात माऊली व देहूतील मंदिरातील नित्य उपचार व महापूजा परंपरेप्रमाणे करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्च २०२० पासून लागू करून अधिसूचना जारी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) ज्ञानेश्वर महाराज संस्थांन कमिटीच्या प्रमुख विश्वस्तांची विशेष बैठक पार पडली. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते. भाविकांच्या तसेच वारक?्यांच्या आरोग्य संबंधी खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्थ अॅड. विकास ढगे पाटील यांनी ३१ मार्च पर्यंत मंदिर व परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्याची तारीख जाहिर केली. तर शासन निर्णय आल्यानंतरच भाविकांच्या देवदर्शनासाठी मंदिर व परिसर पुन्हा खुले केला जाईल असे जाहीर केले.
देहूतील विठ्ठल मंदिर देखील दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय...
देहूगाव- कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यासह देशभरात उद्भवलेल्या आपतकालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने दि.17 मार्च ते 23 मार्च या पुढील सहा दिवसांसाठी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.पुढील 31 मार्च पर्यंतचे संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सर्व धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे आदी उपस्थित होते.
आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता त्याला अटकाव घालण्यासाठी राज्यातील संस्थानांनी मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद करावीत असे राज्यशासनाने अवाहन केले होते, या अवाहनाला प्रतिसात देत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने दि. 17 मार्च ते 23 मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहेत. मात्र सदर कालावधीत मंदिरातील नित्यपूजा सुरू राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देहूतील मंदिरात नित्य पुजा फक्त होतील. कोरोना वायरसचा प्रभाव लक्षात घेता हा निर्णय घेत आहे, असे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूच्या अध्यक्षांनी कळविले आहे.
येत्या शुक्रवारी (दि.२०) पापमोचनी भागवत एकादशी आहे; मात्र या दिवशी भाविकांनी संस्थांनच्या निर्णयाची अंमलबजावणी करत दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन आळंदी व देहू संस्थांनच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.
गजानन महाराज मंदिरही बंद...
कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील श्री गजानन महाराज मंदिरही ३१ मार्चपर्यंत भाविकांच्या देवदर्शनासाठी बंद करण्यात आहे. या काळात 'श्री'चे दैनंदिन महापूजा व इतर धार्मिक विधी संस्थांनच्या वतीने घेण्यात येईल अशी माहिती संबंधितांनी दिली.