विहार लेकची पक्ष्यांना संजीवनी
By admin | Published: May 6, 2017 05:35 AM2017-05-06T05:35:47+5:302017-05-06T05:35:47+5:30
उन्हाळा व पावसाळ्याच्या कालावधीत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या संजय गांधी नॅशनल पार्क व त्यास लागून असलेल्या ठाणे शहराचे
सुरेश लोखंडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उन्हाळा व पावसाळ्याच्या कालावधीत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या संजय गांधी नॅशनल पार्क व त्यास लागून असलेल्या ठाणे शहराचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलातील वन्यपाणी व पशुपक्ष्यांच्या इत्थंभूत हालचाली कॅमेऱ्याद्वारे ट्रॅप केल्या जात आहेत. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वेक्षण लवकरच हाती येणार असल्यामुळे वन्यजीवप्रेमींसह नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
नॅशनल पार्क व येऊर जंगलातील वन्यप्राणी, पशू व पक्ष्यांचे प्रक्षेपण सरकारी वाहिन्यांसह नॅशनल जिओग्रॉफीसारख्या विविध वाहिन्यांवर दाखवले जाण्याची तयारी सुरू आहे. बिबट्या, हरीण, सांबर, लांडगे, कोल्हे,रानडुक्कर, सरपटणारे प्राणी, विविध जातींचे पक्षी आदींचा मुक्तसंचार या कॅमेऱ्यांद्वारे टिपला जात आहे. यासाठी ठिकठिकाणच्या जागांवर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचेदेखील चित्रीकरण केले जात आहे. यामध्ये अन्य नवीन प्राण्यांचा समावेश झाला की काय, आदींचा लक्षपूर्वक अभ्यास करून ती माहिती उघड केली जाणार आहे.
येऊर जंगल परिसर नॅशनल पार्कला लागून असून त्यातून वाहत जाणाऱ्या नद्यानाल्यांचे पाणी कमी झाल्यामुळे ते आता वाहत नाहीत. मात्र, डबक्यांच्या रूपाने अडकलेल्या पाण्याच्या ठिकाणांना पाणवठे म्हणून ओळखले जात आहे. वाढत्या तापमानाने या जंगलातील सुमारे ३५ पाणवठे कोरडे पडले आहेत. शिल्लक राहिलेल्या सुमारे २० पाणवठ्यांवर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या रांगा लावत आहेत. दिवसभर उन्हामुळे जीवाची लाहीलाही झालेले प्राणी संध्याकाळचा थोडा अंधार पडताच चेना नदीपात्रातील या सुमारे २० पाणवठ्यांवर सुमारे चारशेपेक्षा जास्त प्राण्यांची गर्दी तहान भागवत आहे. या पाणवठ्यांवर जीव धोक्यात घालण्याऐवजी काही प्राणी विहार लेक, पवईसारख्या धरणांच्या पाण्याचा आसरा घेत आहेत. याद्वारे या वन्यजीव प्राण्यांना नवसंजीवनी मिळत असल्याचे वास्तव या कडकडीत उन्हात भटकंती करणारे पर्यावरण व वन्यजीवप्रेमी यांच्याकडून सांगितले जात आहे.
येऊरच्या या जंगलपट्ट्यात ‘इंडियन एअर स्फोर्स’चे कार्यालय असून जवानांचा वावरही या जंगलाची शान वाढवत आहे. याशिवाय, सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या ३०० आदिवासी पाड्यांचेदेखील या येऊरच्या जंगलात वास्तव्य आहे. या गावपरिसरांसह जंगलात सुमारे दोन हजार ३६५ पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे. याव्यतिरिक्त सुमारे १११ पक्ष्यांचे सर्वेक्षण नुकतेच केले असता त्यात सुमारे १३ नवीन पक्ष्यांचा समावेश आढळून आला आहे.
बुद्ध पौर्णिमेला होणार गणना
आंतरराष्ट्रीय पक्ष्यांप्रमाणे या पक्ष्यांच्या जाती असल्याचे बोलले जात आहे. १० मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री येऊरमधील सुमारे १२ पाणवठ्यांवर येणाऱ्या पशुपक्ष्यांची गणना केली जाणार आहे. त्यात आढळणाऱ्या प्राणी, पशुपक्ष्यांची नोंद केली जाणार आहे. या गावपरिसरांसह जंगलात सुमारे दोन हजार ३६५ पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे.