अलंकापुरी आज भारावली : उद्या ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 08:14 PM2018-07-05T20:14:23+5:302018-07-05T20:15:18+5:30
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष,हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा नादमय आणि भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली.
आळंदी : ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष,हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा नादमय आणि भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली. शुक्रवारी (दि. ६) ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होत आहे. यानिमित्त आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. तीर्थक्षेत्रातील रस्ते गर्दीने व्यापले आहेत. शहरात हरिनाम गजर, कीर्तने, प्रवचने तसेच धार्मिक उत्सवाला टाळ, मृदंग, वीणेचा साथ मिळत आहे. अलंकापुरी भक्तिरसात न्हाहली आहे.पावसाच्या हलक्या सरीने रस्ते चिखलाने माखले आहेत. पहिला मुक्काम जुन्या गांधी वाड्याच्या जागेतल्या देवस्थानचे आजोळघरी समाज आरतीने विसावणार आहे. रात्री जागर आणि मुक्काम पाहुणचाराने सोहळा शनिवारी (दि.७) भल्या पहाटे पुण्याकडे मार्गस्थ होईल. या प्रस्थान सोहळ्याची मंदिरासह आळंदीत जय्यतपणे तयारी सुरु झाली आहे. यात आळंदी नगर परिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हा महसूल, पोलीस, आरोग्यसेवा, वीज महावितरण विभाग देखील पुढे आहे. श्रींच्या प्रस्थानाला भाविकांची सोय करण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. सुविधांसाठी आदेशावर काम करण्याची लगबग सुरु आहे.
मंदिराचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर यांनी मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. भगवी पताका उंचावत ज्ञानोबा-माऊली-तुकोबांचे नामगजरात अलंकापुरी दुमदुमली आहे. पवित्र इंद्रायणी नदी पाण्याने दुथडी भरून वाहते आहे. यामुळे स्नानाची चांगली सोय झाली आहे. भाविकांनीदेखील पहाटेपासून नदीला स्नानास गर्दी केली. नदीवर स्नान, प्रदक्षिणा, श्रींचे देवदर्शन, धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत सोहळ्यात सहभागी झाले. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा भाविकांची गर्दी झाल्याने नदीघाटावर वैभव वाढले. आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाईने नदीचा परिसर लख्ख उजळला. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शनबारीतून समाधीचे दर्शन घेतले. गेल्या दोन दिवसांपासून दिंड्यांचे आगमन होत आहे. भाविकांची मांदियाळी आळंदीत आली आहे. महिला, वृद्ध तसेच तरुण वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. श्री विठुरायाच्या भेटीला जाण्यास माऊलींच्या वारीत भाविक येत आहेत. यामुळे भाविकांची गर्दी अधिकाधिक वाढली आहे.
ठळक मुद्दे
- तीर्थक्षेत्रातील मठ, मंदिरे, धर्मशाळा, नदीकिनारा, गोपाळपूर, नगर परिषदेच्या शाळेची मैदाने भाविकांच्या गर्दीने गजबजली आहे. खुल्या जागेत भाविकांनी राहुट्या, तंबू उभारले असून, पावसासाठी निवाऱ्याची सोय झाली आहे.
- ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस असा दुहेरी पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात झाल्याने तीर्थक्षेत्र आळंदीला छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाटाच्या दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आळंदीत दर्शनबारी, आजोळघर येथेही पोलिसांचा खडा पहारा आहे.
- ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जयघोष करीत भाविकांची वाहने, दिंड्या प्रवेश करीत आहे. खांद्यावर भगवी पताका, तुळशी, टाळ आणि हरिनाम घेत, गळ्यात वीणा घेत वारकऱ्यांचा ओघ सुरु आहे.
- महसूल प्रशासनाने केरोसीन आणि गॅस इंधन पुरवठा सुरु केला आहे. सवलतीच्या दरात इंधन पुरवठा सुरु करण्यात आला आहे. भाविकांना केरोसीन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इंधन पुरवठ्यासाठी माहितीसाठी चावडी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी केले आहे.