संत निवृत्तीनाथ पालखीचे एसटीने फाडले तिकीट! परिवहन महामंडळाची असंवेदनशीलता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:29 AM2020-07-01T01:29:26+5:302020-07-01T06:42:38+5:30
अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. त्यामुळे एरवी लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे.
यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते. काही संतांच्या पालखीसाठी हेलिकॉप्टरचीही चर्चा झडली होती. त्यामुळे शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असाच समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. परंतु सोमवारपर्यंत शासनाकडून कसलेही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.
आम्ही दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केलेली होती. परंतु, दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शविली. अखेर संस्थानने प्रवासभाडे भरले. - पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर
नाथांच्या पादुकाही मार्गस्थ
पैठण (जि. औरंगाबाद) : आषाढीवारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पादुका परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने मंगळवारी नाथ मंदिरातून रवाना झाल्या. १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका नाथ मंदिरात मुक्कामी होत्या. रोहयो तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे व पालखी प्रमुख रघुनाथ महाराजांच्या हस्ते पादुका शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आल्या.
पायी वारी काढण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई : संत तुकाराम महाराज म्हणतात की, विठ्ठल सर्वत्र आहेत. त्यामुळे जिथे आहात तिथेच त्याची पूजा करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने वाखरी ते पंढरपूर असा सहा किमीचा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीची याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. पंढरपूरमध्ये १० लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात नगर प्रदक्षिणाच्या ठिकाणी एक व्यक्ती बाधित आहे. खुद्द उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहन चालकास कोरोना झाला आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करून घेऊ इच्छित नाही, असे उच्च न्यायालयाने सांगितले. जगन्नाथ पुरी रथ यात्रेच्या परवानगीनंतर ही याचिका दाखल झाली होती.