संत सोपानदेव निघाले ज्ञानोबाच्या भेटीला
By admin | Published: June 22, 2017 07:20 AM2017-06-22T07:20:55+5:302017-06-22T07:20:55+5:30
ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या भाऊगर्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे
सासवड : ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या भाऊगर्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे आषाढी वारीकरिता बुधवारी (दि. २१) सासवडहून वैभवशाली प्रस्थान झाले. पालखीचा आज पांगारे गावी मुक्काम आहे. हजारो सासवडकरांनी या सोहळ्याला हजेरी लावून हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतला.
दरम्यान, आज आषाढ वद्य बारस (द्वादशी) आणि सोपानदेव पालखीचा प्रस्थान दिन असल्याने मंदिरात पहाटे चार वाजता काकडआरती, अभिषेक, महापूजा आदी धार्मिक विधी झाले. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संत ज्ञानदेव माऊलींचा आज सासवड मुक्काम सकाळी ११ वाजता प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांचा आत घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले.
त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका बँक व अन्य संघटनांकडून आणि सासवड नगरपालिकेकडून दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले. ‘माझिया वडिलांची मिराशी गा देवा..तुझी चरणसेवा बा पांडुरंग’ हा अभंग होऊन दुपारी ठीक १ वाजता पालखीची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी उत्तरेकडील दरवाजाने, तर पादुका पूर्वेकडील मुख्य दरवाजातून आणून हा सोहळा देऊळवाड्यातून बाहेर पडला.
आजच्या प्रस्थान कार्यक्रमाला, सोपानकाका बँकेचे चेअरमन संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद झळक, बँक आॅफ इंडियाचे अधिकारी नंदकिशोर सोनार, मिलिंद कर्वे, सासवड शाखाप्रमुख नीलेश मोरे, माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, सारिका हिवरकर, वसुधा आनंदे, कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते तसेच आळंदी, देहू, पंढरपूर, मुक्ताईनगर येथील देवस्थानचे प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते. दुपारी जेजुरी नाक्यावरून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा मार्गस्थ झाला. काही वेळाने संत चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.